[पावसाळ्यातील एक दिवस] निबंध मराठी | Pavsalyatil ek divas Marathi nibandh

पावसाळ्यातील एक दिवस - Pavsalyatil ek divas Marathi nibandh : पावसाळा ऋतु हा दरवर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत राहतो. दक्षिणेकडून येणारे थंड वारे आपल्यासोबत पाऊस घेऊन येतात. या वाऱ्यांना मान्सून वारे म्हटले जाते. आजच्या या लेखात मी पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध आणि प्रसंग लेखन तुमच्यासोबत शेयर करणार आहे.  

पावसाळ्यातील एक दिवस या लेखात आपणास पाच मराठी निबंध देण्यात आलेले आहेत. यापैकी आपल्या आवडीचा आणि आपल्या गरजेनुसार आपणास उपयोगी ठरणारा निबंध तुम्ही वापरू शकतात. तर चला सुरू करूया..
पावसाळ्यातील एक दिवस - Pavsalyatil ek divas Marathi nibandh (१०० शब्द)

त्यावर्षी जुलै महिना उजाडला होता तरी अद्याप पावसाचा काही पत्ता नव्हता. हवामान खूप उष्ण आणि दमट होते. आकाश ढगरहित झाले होते. सर्वजण या उष्णतेने हैराण होते. पण एकेदिवशी शाळेत असतांना अचानक काही वेळातच ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. सर्वांसाठी हा पाऊस स्वागतार्ह होता. अनेक जणांनी छत्री आणली नव्हती म्हणून ते पावसात अडकले. त्यांनी इकडे तिकडे आश्रय घेतला. काहींनी पावसात फिरणे पसंत केले. लहान मुलं घराबाहेर पडली. ते इतके आनंदी झाले की पावसात भिजू आणि नाचू लागले. घरी पोहोचताच मीही भिजायला गच्चीवर गेलो आणि मनसोक्त भिजलो. त्यानंतर मी आणि माझ्या बहिणीने मिळून कागदी होडी बनवली आणि वाहत्या पाण्यात सोडून दिली. त्यादिवशी आम्ही खूप मज्जा केली. तो पावसाळ्यातील एक सुखद दिवस होता.


पावसाळ्यातील एक दिवस निबंध (२०० शब्द)

ती पावसाळ्यातील रविवारची सकाळ होती मी अजूनही अंथरुणावरच पडून होतो. ९ वाजता मला अचानक आमच्या खिडकी आणि बाल्कनीमध्ये पाणी पडल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मला खूप आनंद झाला. मला माहित होते की पाऊस पडत आहे मी अंथरुण उशिरा सोडण्याची योजना आखली होती पण पाऊस पडत आहे हे कळताच मी एक मिनिटही बेडवर न थांबता लगेचच पाऊस बघायला बाल्कनी मध्ये गेलो. मुसळधार पावसाने सर्वत्र रस्ते ओले झाले होते आणि सगळीकडे सुंदर धुके पसरले होते. मातीचा सुंदर असा सुगंध सर्वत्र पसरला होता. सोसाट्याचा वाराही सुटला होता. पावसापासून वाचण्यासाठी सर्वाची लगबग सुरू झाली होती. दूरवर पक्षीही आडोसा शोधत होते. मधूनच पाऊस वेग पकडायचा आणि टपोरे थेंब पडायला सुरुवात व्हायची. मी अर्धा तास पावसाचं हे मनमोहक दृश्य न्याहाळत होतो. नंतर अतिउत्साहाने मी माझ्या आईची परवानगी घेतली आणि  कागदी होड्या बनवायला सुरुवात केली. होड्या बनवून मी खाली पार्किंग एरियात आलो आणि पावसात खूप भिजलो, पाण्यात होड्या देखील सोडल्या.

तब्बल ३ तास भरपूर पाऊस झाला. त्यानंतर सूर्यदेवाने दर्शन दिले आणि थोडे ऊन पडले. पाऊस पडून गेल्यानंतरही वातावरण खूप छान आणि आल्हाददायक झाले होते. हवेत गारवा पसरला होता. थोड्या वेळाने सुंदर असे इंद्रधनुष्यही दिसले. मी मोबाइल मध्ये त्याचे फोटो काढून घेतले. माझ्यासाठी तो खरोखरच एक अतिशय आनंदाचा पावसाळी रविवार होता. त्या रात्री इंद्रधनुष्याचे फोटो बघत मी माझा अनुभव माझ्या डायरीत लिहायला बसलो.


पावसाळ्यातील एक दिवस (३०० शब्द)

पाऊस किती लहरी! जूनची सात तारीख सरली, तरी पावसाचा पत्ता नव्हता. एवढेच काय ! पावसाची दूरवर कुठे चिन्हेही दिसत नव्हती. उकाड्याने माणसे बेजार झाली होती. पावसाचे नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते काय माहीत? जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. उकाड्याने लोक अतिशय हैराण झाले होते. पावसाचे आगमन जसजसे लांबत होते, तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पळत होते. नानाविध प्रकारे लोक वरुणराजाची आराधना करत होते. जमीन नांगरून शेतकरी खिन्नतेने आकाशाकडे डोळे लावून बसला होता. प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा होती की पाऊस पडावा, थंडावा मिळावा.

या उन्हाला कंटाळून मीही आमच्या घराच्या गच्चीवर जाऊन बसलो होतो.  अचानक सभोवार अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला. हवेत एक गारवा पसरला. मला तर सौमित्रच्या कवितेच्या ओळी आठवल्या, 

चक्क डोळ्यांसमोर ऋतु कोस बदलून घेतो,

पावसा आधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो?

सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले. 'आला, आला, पाऊस आला!' असे म्हणत ते पावसाच्या स्वागताला सज्ज झाले. आणि खरोखरच पाऊस कोसळू लागला. टपोरे थेंब बरसू लागले. खूप उशीर झाल्यामुळे जणू त्यांना कोसळण्याची घाई झाली होती. हा काळ्या ढगांचा तानसेन जणू मेघमल्हाराच्या ताना घेत असावा. आगमनाला उशीर झाल्यामुळे त्याला अपराधी वाटले असावे, म्हणून सतत अखंडपणे अविरत कोसळत होता. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट यामुळे सारे वातावरणच बदलून गेले. मातीचा सुगंध सर्वदूर पसरला होता. पावसाच्या आगमनाने अवघा निसर्ग थक्क झाला होता. तीन तासांनंतर पाऊस ओसरला. अचानक आला तसा अचानक थांबला.

केवढा किमयागार हा पहिला पाऊस ! भोवतालच्या वातावरणात कितीतरी कायापालट झाला होता. आकाशातील काळे अभ्र हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. तृषार्त धरती टवटवीत दिसत होती. पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. झाडात दडलेली, पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडवून जणू वर्षाराणीचे आभार मानत होती. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे डबडबले होते. आनंदाश्रू होते ते ! पावसाळ्याचा तो पहिला दिवस मी कधीच विसरणार नाही. असा हा किमयागार पहिला पाऊस!


पावसाळ्यातील एक दिवस (४०० शब्द)

मला एक पावसाळी दिवस आठवतो ज्याने मला एक विलक्षण अनुभव दिला. तो सोमवार होता आणि माझ्या गणिताच्या शिक्षकांनी गणिताची परीक्षा ठेवली  होती. मी परीक्षेसाठी तयार नव्हतो. मला वाटत होते की परीक्षा रद्द झाली पाहिजे. मी देवाकडे प्रार्थना केली की, ‘देवा, आज परीक्षा रद्द होऊदे.’ जुलै महिना असूनही पाऊस पडेल असे वाटत नव्हते. सूर्य दिसत होता आणि ऊनही पडले होते. मी घाईघाईने शाळेची तयारी केली आणि वेळेवर शाळेत पोहोचलो. 

पहिल्या तासानंतरच अचानक काळे ढग दाटून यायला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा सुटला. ढगांचा गडगडाट सुरू झाला. आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागला. आमचा खेळाचा तास सुरू झाला. पाऊस पडत असल्याने शिक्षकांनी आम्हाला मैदानावर खेळायला सोडण्यास नकार दिला. पण मग आम्ही खूप हट्ट केल्यामुळे शेवटी त्यांनी आम्हाला पावसात खेळायला सोडले. 

आम्ही वीर योद्ध्यांसारखे मैदानात उतरलो आणि अंगावर पावसाच्या सरींचा आनंद घेतला. जेव्हा पाण्याचा थेंब तुमच्या गालाला स्पर्श करतो तेव्हा हा एक विलक्षण अनुभव असतो. लहान मुलांप्रमाणे आम्हीही कागदी होड्या बनवल्या आणि पावसाच्या पाण्यात सोडल्या. आम्ही एवढ्या पावसात, चिखलात कबड्डी खेळलो. कित्येक मुलं तर घसरून पडली देखील पण तरीही पुन्हा खेळायला आली आणि आम्ही खूप मजा केली. आम्ही पावसात चिंब भिजलो होतो.

अचानक पावसाचा वेग वाढला. मोठे मोठे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली. मग मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून शिक्षकांनी आम्हाला वर्गात बोलावले. आम्ही पूर्णपणे भिजलो होतो त्यामुळे तसेच आम्ही वर्गात बसलो. गणवेश ओला झाल्यामुळे थंडीही वाजू लागली. पुढचा तास गणिताचा होता. परीक्षेच्या भीतीने आणखी थंडी वाजू लागली. 

तेवढ्यात गणिताचे सर वर्गात आले. त्यांनी बघितलं की आम्ही भिजलो आहोत. मग त्यांचाही मूड बदलला आणि त्यांनी परीक्षा रद्द केली. सर्व मुलं खूप आनंदी झाली. पाऊस खूप असल्याने चार तासानंतरच आमची शाळा सोडून दिली. आम्ही घरी परतलो. घरी जाताना रस्ते पाण्याने भरलेले दिसले. सगळीकडे चिखल झाला होता. वाऱ्यामुळे माझ्या मित्राची तर छत्रीच उडून गेली. मग मी त्याला माझ्या छत्रीत घेतले. काही पिल्ले रस्ता ओलांडण्यासाठी धडपडत होती आम्ही त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत केली. चपलीने पाणी उडवत मी घरी पोहोचलो. त्या संपूर्ण आठवड्यात खूप मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे मला शाळेलाही एक आठवडा सुट्टी मिळाली.

त्या दिवशी मी पावसाची खूप गाणी ऐकली. आणि त्याच दिवशी मला देखील माझी पहिली कविता सुचली. 

पाऊस आलाय..भिजून घ्या

थोडा मातीचा गंध घ्या

थोडा मोराचा छंद घ्या

उरात भरून आनंद घ्या..

आलाय पाऊस..भिजून घ्या


बघा समुद्र उसळतोय

वारा ढगांना घुसळतोय

तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..

आलाय पाऊस..भिजून घ्या


बघा निसर्ग बहरलाय

गारव्याने देहही शहारलाय

मनही थोडं मोहरून घ्या..

आलाय पाऊस..भिजून घ्या

शेवटी, प्रत्येक ऋतूचे वेगळे महत्त्व असते पण मला पावसाळा सर्वात जास्त आवडतो. मी माझ्या आयुष्यात अनेक पावसाळी दिवस अनुभवले आहेत, मजा केली आहे पण त्यासर्वांपैकी हा पावसाळ्यातील एक दिवस माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे.पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध लिहिलेला - a rainy day paragraph in marathi

पावसाळ्याला ऋतूंचा राजा म्हटले जाते. उन्हाळ्यात पडणाऱ्या भयंकर उष्णता आणि गर्मी पासून पावसाच्या शितल लहरी आपली सुटका करतात. व संपूर्ण वातावरण सुखद गारव्याने भरून देतात. भारतात पावसाळा जुलै महिन्यात सुरू होऊन सप्टेंबर पर्यंत राहतो. या दरम्यान काही भागात अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी पाऊसच येत नाही. असो माझ्या आयुष्यातही पावसाळ्यातील एक अविस्मरणीय दिवस आलेला आहे. मी त्या दिवसाच्या काही आठवणी आज लिहू इच्छितो.


ते दिवस जुलै महिन्याचे होते शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. पण अजून पावसाळा आलेला नव्हता. बऱ्याच दिवसांपासून भयंकर उष्णता जाणवत होती. रस्ते, घर, शाळा आणि चारही दिशा आग ओकत होत्या. पंखा देखील गरम उष्णतेने भरलेली हवा फेकत होता. त्या दिवशी संध्याकाळचे 4 वाजेले होते आम्ही वर्गात बसलो होतो. अचानक जोरदार थंडगार वारा वाहू लागला. खिडक्या एकमेकांवर आदळायला लागल्या. चारही दिशांना अंधकार निर्माण झाला. आमच्या सरांनी शिकवणे थांबून, वर्गातील लाईट लाऊन दिली. असे वाटायला लागले की रात्रच झाली आहे. सर्वांनी आपापली वह्या पुस्तके सांभाळली. आणि जोरदार कडकडाटाने पाऊस सुरु झाला.


पत्र्याच्या छतावर पडणारे पावसाचे थेंब आवाज करू लागले. थोड्या वेळात खिडक्या मधून पाण्याचे शॉवर आत येऊ लागले. सर्वांनी आपली पुस्तके बॅगेत ठेवली. पाहता पाहता ढग अजून काळी झाली. असे वाटायला लागले की जसे कोणी आकाशाला पेनाची शाही लावली आहे. शाळेची गॅलरी पूर्णपणे ओली झाली, मैदानातही ठीक ठिकाणी पाण्याचे डबके साचले.


आता शाळा सुटण्याची वेळ झाली होती, ज्या मुलांची घरे शाळेजवळ होते त्यांना सर जाऊ देत होते. शाळेजवळ घरे असणारी लहान मुले कागदाची होळी बनवून सोडू लागले. शाळेच्या बाहेर खूप पाणी साचून गेले होते. काही खोडकर मुले एकमेकांवर ते पाणी उडवत होतें पण जेव्हा सरांनी त्यांना पहिले तेव्हा ते पळत सुटले. शाळेच्या शिपायाने शाळा सुटण्याची घंटा वाजवली. अजून पावसाचे पाणी बंद झाले नव्हते परंतु आधीपेक्षा कमी होते. मी शाळेतून पटापट चालत घराकडे निघालो. पावसामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जमा झाले होते. पावसाच्या पाण्यामुळे मी भिजून गेलो. घरी आल्यावर आईने मला कपडे बदलून डोके टॉवेलने पुसायला सांगितले. 


यांनतर माझ्या आईने मला गरमागरम चाय बनवून दिली. मी घराच्या खिडकी जवळ बसून पावसाचा आनंद घेत चहा प्यायला लागलो. अश्या पद्धतीने पावसाळ्यातील हा माझा एक अविस्मरणीय दिवस होता.

समाप्त 


तर मित्रांनो हे होते पावसाळ्यातील एक अविस्मरणीय दिवस (Pavsalyatil ek divas) या विषयावरील मराठी निबंध. या लेखात आम्ही पावसाळ्यातील एक दिवस या विषयावर एक सोडून पाच मराठी निबंध दिलेले आहेत.

तुम्हाला Pavsalyatil ek divas Marathi nibandh हे प्रसंग लेखन कसे वाटले कमेन्ट करून नक्की सांगा. व मराठी भाषेतील कोणताही निबंध मिळवण्यासाठी वर देण्यात आलेल्या सर्च बटन चा उपयोग करा. धन्यवाद...

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

4 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने