मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि भावविश्वाचा जिवंत श्वास आहे. साहित्य ही समाजाला दिशा देणारी शक्ती आहे.
आज मराठी साहित्य वाचणारी माणसं कमी होत आहेत, ही केवळ चिंतेची बाब नाही तर आपल्या संस्कृतीपुढे उभं राहिलेलं एक मोठं आव्हान आहे. पुस्तकांच्या पानांत दडलेले विचार, भावना आणि संस्कार जिवंत ठेवायचे असतील तर मराठी साहित्याची चळवळ अधिक सक्षम करावी लागेल.
मराठी साहित्य प्रबळ करण्यासाठी सर्वप्रथम मराठी वाचनाची आवड प्रत्येक घरात रुजली पाहिजे. मुलांच्या हातात मोबाईलसोबत पुस्तकही दिसलं पाहिजे. नवोदित लेखकांच्या लेखणीला संधी मिळाली पाहिजे, कारण प्रत्येक नव्या लेखकाच्या मनात एक नवं विश्व जन्म घेण्याची ताकद असते. गावोगावी वाचनालये, साहित्य कट्टे आणि काव्यसंमेलने भरली पाहिजेत. शब्दांवर प्रेम करणारी माणसं एकत्र आली तर साहित्याची ज्योत कधीच विझणार नाही.
आज गरज आहे ती मराठी भाषेचा अभिमान मनात बाळगण्याची. आपण मराठीत बोललो, लिहिलं आणि वाचलं तरच ही भाषा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल. साहित्य हे फक्त अक्षरांचं जग नाही; ते माणसाला माणूस बनवणारं सामर्थ्य आहे.
जर मराठी साहित्य टिकून राहिलं, तर आपल्या भावना, आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपली ओळखही जिवंत राहील. म्हणूनच प्रत्येकाने एक पुस्तक वाचावं, एका लेखकाला प्रोत्साहन द्यावं आणि एका नव्या विचाराला जन्म द्यावा. कारण शब्द जिवंत असतील, तर समाजही जिवंत राहील. आणि मराठी साहित्याचा दीप अशाच असंख्य हृदयांच्या प्रकाशाने सदैव तेवत राहील.
मराठी साहित्य जिवंत राहील तेव्हा मराठी माणसाची ओळख ही अधिक समृद्ध होईल. म्हणूनच लेखक , वाचक, शिक्षक, आणि समाज या सर्वांनी एकत्र येऊन मराठी साहित्याचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित ठेवणे हे काळाची गरज आहे. मराठी शब्दांचे हे वैभव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हीच आपल्या सर्वांची खरी जबाबदारी आहे.
-लेखिका: अभिलाषा देशपांडे
डोंबिवली ,मुंबई
भ्रमण ध्वनी-७७१५८६१८५९
