*आषाढ - मनाला पडणारा पहिला पाऊस*
आषाढ हा महिना दिनदर्शिकेत दरवर्षी येतो. पण मनात मात्र तो प्रत्येक वेळी नव्याने उगवतो. पहिल्या सरी कोसळतात. अंगणात मातीचा सुगंध दरवळतो आणि नकळत मनाच्या कोपऱ्यात साचलेली धूळही धुऊन निघू लागते. पाऊस फक्त धरतीवर पडत नाही. तो माणसाच्या अंतरंगातही झिरपत असतो.लहानपणी आषाढ म्हणजे कागदी होड्या, चिंब भिजलेले रस्ते, आईने केलेली गरम भजी आणि खिडकीत बसून पावसाच्या सरी मोजण्याचा हट्ट. मोठे झाल्यावर मात्र त्याच आषाढाला वेगळे अर्थ लाभतात. एखाद्या शेतकऱ्याच्या डोळ्यांतील आशा दिसते. मातीवर विसावणाऱ्या बीजाचा विश्वास दिसतो आणि श्रमावर उभे राहणाऱ्या आयुष्याची कहाणी ऐकू येते.
आषाढाची चाहूल लागली की पंढरीची वाटही जागी होते. खांद्यावर पताका, हातात टाळ आणि मुखी विठ्ठलाचे नाम घेऊन चालणारा वारकरी पाहिला की एक प्रश्न मनात उभा राहतो.देव भेटण्यासाठी एवढा मोठा प्रवास करावा लागतो की माणूस होण्यासाठी? त्या चालण्यात भक्ती आहे पण त्याहून मोठी समता आहे. त्या पावलांत श्रद्धा आहे पण त्याहून गहिरा माणुसकीचा स्पर्श आहे.
आयुष्य हे पेरणीसारखे असते. आज टाकलेले बी उद्या उगवेलच याची खात्री नसते. पण ते टाकल्या -शिवाय पीक येत नाही. म्हणूनच विश्वास, संयम आणि परिश्रम यांचा धडा हा महिना अगदी सहज शिकवून जातो. पावसाच्या प्रत्येक सरीबरोबर मनातील निराशेलाही वाहून जाण्याची संधी मिळते.कधी कधी वाटते आषाढ बाहेर कमी आणि माणसाच्या आतच जास्त बरसत असतो. कोरडी पडलेली नाती ओलावतात. रुसलेले मन मोकळे होते. विसरलेली प्रार्थना पुन्हा ओठांवर येते. हिरवाई फक्त शेतातच फुलत नाही. ती विचारांतही उगवते.
म्हणूनच आषाढाचे महत्त्व सांगण्यासाठी पंचांगातील तारखा, सण किंवा परंपरा पुरेशा नाहीत. त्यासाठी पावसात भिजणारी माती अनुभवावी लागते.
विठ्ठलाच्या नामात विरघळलेली वारी पाहावी लागते आणि स्वतःच्या मनात पडणाऱ्या पहिल्या सरी ऐकाव्या लागतात.
आषाढ हा ऋतू नाही, महिना नाही. तो आशेचा ओलावा आहे. आयुष्य कितीही उन्हाने करपले तरी पुन्हा एकदा हिरवे होण्यावर विश्वास ठेवायला शिकवणारे नाव म्हणजे.*आषाढ*.
-अभिलाषा देशपांडे
मुंबई ,महाराष्ट्र