मराठी राजभाषा दिन कविता : आपल्या देशात दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म झाला होता. 27 फेब्रुवारी हा कवि कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
आजच्या या लेखात आपण मराठी भाषा दिन कविता (Marathi Bhasha din Kavita) पाहणार आहोत.
Marathi Din Poem |
मराठी भाषा दिन कविता 1
शीर्षक: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
गीतकार : कुसुमाग्रज
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा
मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेश <येथे वाचा
मराठी राजभाषा दिन कविता 2
शीर्षक: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
कवी: सुरेश भट
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमच्या मनामनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
Marathi diwas poem कविता 3
शीर्षक: माझ्या मराठीची गोडी
कवी: वि. म. कुलकर्णी.
माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट,
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित.
ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची,
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची.
'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची,
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची.
डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी,
मुजर्याची मानकरी
वीरांची ही मायबोली.
नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर,
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर.
हिचे स्वरूप देखणे
हिची चाल तडफेची,
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची.
कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती,
आचार्यांचे आशिर्वाद
हिच्या मुखी वेद होती.
माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी,
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी.
मराठी भाषा दिन कविता
मराठी राजभाषा दिन कविता 4
शीर्षक: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
कवयित्री: संजीवनी मराठे
माय मराठी! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.
कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई,
मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.
तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा,
हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.
माय मराठी! तुझिया अंकी लोळण घेते, बागडते,
तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते.
तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी,
जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.
तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची,
अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.
माय मराठी! तुझियासाठी वात होउनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
--समाप्त--
तर मित्रांनो या होत्या मराठी दिनानिमित्त काही उत्तम मराठी भाषा दिन कविता (marathi bhasha din kavita). या सर्व कवितांच्या कवींची नावे कविते सोबत देण्यात आली आहेत. मला आशा आहे की तुम्हाला या कविता नक्कीच आवडल्या असतील.
या कवितांना Marathi din kavita आपल्या मित्र मंडळीसोबतही नक्की शेयर करा. धन्यवाद..