स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण | Swatantra veer savarkar speech in Marathi

भारताचे महान नेते व देशासाठी आपल्या प्राणांची आहुति देणारे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर. आजच्या या लेखात आपण विनायक दामोदर सावरकर यांचे मराठी भाषण पाहणार आहोत हे swatantra veer savarkar bhashan marathi वीर सावरकर यांच्या जयंती व पुण्यतिथि साठी उपयुक्त आहे. तर चला सुरू करूया. 



स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर मराठी भाषण | Swatantra veer savarkar speech in Marathi

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे विनायक दामोदर सावरकर यांनाच वीर सावरकर म्हणूनही ओळखले जाते. आजही भारतातील बहुसंख्य लोक त्यांना महान क्रांतिकारी म्हणून ओळखतात. विनायक दामोदर सावरकर या क्रांतिकारी देशभक्त अन अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. आज मी तुम्हाला विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल दोन शब्द सांगणार आहे. तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिलेले भाषण शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 


स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 साली नाशिक जवळ असलेल्या भागुर गावात झाला. त्यांचे वास्तविक नाव विनायक दामोदर सावरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर सावरकर आईचे नाव राधाबाई होते. सावरकरांना दोन भाऊ व एक बहीण होती. नऊ वर्षाच्या कमी वयात त्यांच्या आईचे निधन झाले सात वर्षानंतर प्लेग च्या महामारीत त्यांचे वडीलही वारले. 


वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे मोठे भाऊ गणेश यांनी कुटुंबाचे पालन पोषण केले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी 1898 साली त्यांनी मातृभूमीला पारतंत्र्या पासून मुक्त करण्यासाठी देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली. 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्यदेवीचे स्त्रोत्र त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी लिहिले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना विदेशी कपड्यांची होळी करून त्यांनी जनजागृती केली. 1902 मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बीए ची डिग्री प्राप्त केली. 


9 जून 1906 ला ते लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन लंडनला गेले. खरे पाहता श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती मिळवून ते लंडन येथे बॅरिस्टर बनण्यासाठी गेले होते, परंतु तेथे त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रज प्रशासनाविरुद्ध भडकावण्यास सुरुवात केली. 1857 च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास त्यांनी गुप्तपणे छापून भारतात पाठवला. त्याची अनेक भाषांत भाषांतर होऊन देशभक्त क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या एका पिस्तुलाने अनंत कान्हेरे या क्रांतिकारी देशभक्तांने नाशिकचे कलेक्टर एएमटी जॅक्सन याची हत्या केली. या हत्या प्रकरणात ब्रिटिशांनी सावरकरांना लंडन मध्ये अटक केली. व त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी भारतात आण्यात आले. 


'मोरया' या नाविवर पोलिसांच्या पहाऱ्यात ते भारतात येत होते. जेव्हा नाव फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात थांबली. तेव्हा 8 जुलै 1910 च्या सकाळी शौचास जायचे आहे असे सांगून सावरकर शौचालयात गेले. आपल्या अंगावरील नाईट गाऊन काढून काचेच्या दारावर अश्या पद्धतीने टाकला जेणेकरून पहारेकर्‍यांना आतील काहीही दिसणार नाही. यानंतर शौचालयातील शौचकुपा द्वारे ते पोर्ट होल मध्ये पोहचले व तेथून उडी मारून त्यांनी समुद्र मार्गाने फ्रेंच हद्द गाठली. व फ्रेंच सैनिकांच्या अधीन झाले. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या ब्रिटिश सैनिकांनी फ्रेंच आरक्षीला लाच दिली आणि बळाने तसेच अवैधरित्या सावरकरांना परत नौकेवर आणले. सावरकरांना भारतात आणल्यावर न्यायालयाने 50 वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली.


4 जुलै 1911 रोजी त्यांना अंदमान बेटावरील सेल्युलर जेलमध्ये आणण्यात आले. येथील कैद्यांना नारळ सोलून त्यातून तेल काढावे लागत असे. या शिवाय येथे छिलका कुटणे, काथ्था वळणे, कोलू फिरवणे इत्यादी कष्टाची कामे करावी लागत असत. तेथील हाल-अपेष्टा मुळे सावरकरांचे शरीर खंगत गेले. तरीही त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचले. याशिवाय अनेक पुस्तके वाचली. सावरकर दुनियेतील पहिले अशी कवी होते ज्यांनी अंदमानच्या एकांत कारागृहात भिंतीवर खीळ आणि कोळशाने कविता लिहिल्या. 


1921 मध्ये सावरकरांना अंदमानातून रत्नागिरीच्या तुरुंगात आणण्यात आले. तेथे त्यांनी हिंदुत्व आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले. जवळपास 10 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा व 2 वर्षे रत्नागिरी तुरुंगातील शिक्षा भोगल्यानंतर 1924 साली त्यांना अनेक अटींवर मुक्त करण्यात आले.


आपल्या सुटकेनंतर सावरकरांनी 23 जानेवारी 1924 ला रत्नागिरी हिंदू सभेची स्थापना केली. या संघाचा उद्देश भारतीय प्राचीन संस्कृतीला संरक्षित करून समाजाचे कल्याण करणे होते. नंतर सावरकर लोकमान्य टिळकांची स्वराज्य पार्टी मध्ये सामील झाले. त्यांना हिंदुमहासभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. नंतरच्या काळात हिंदुमहासभेने पाकिस्तान निर्माणाचा विरोध केला. गांधीजींच्या निर्णयाने असहमत असलेल्या हिंदू महासभेचा एक तरुण नथुराम गोडसे याने 1948 मध्ये गोळी मारून गांधीजीची हत्या केली. गांधी हत्या प्रकरणात भारत सरकारने सावरकरांनाही अटक केली परंतु त्यांच्याविरुद्ध पुरावे न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. 


आपले धाडस व साहित्याच्या बळावर समाजात प्रबोधन घडवणाऱ्या या महापुरुषाने अन्नत्याग करून 26 फेब्रुवारी 1966 ला 83 वर्षाच्या वयात देह त्यागून मृत्यूला कवटाळले. भारताच्या या महान आत्म्याला कोटी कोटी प्रणाम. जय हिंद जय भारत. 


विनायक दामोदर सावरकर यांची संपूर्ण माहिती वाचा येथे 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने