मित्रांनो भारतीयांचा प्रमुख सण दिवाळी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी दरम्यान चारही बाजूंना उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळते. आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 4 उत्तम Diwali Essay in Marathi - दिवाळी निबंध मराठी शेअर करीत आहोत.
या लेखात देण्यात आलेले दिवाळी चे निबंध 100, 200, 300, 400 शब्द प्रकारात देण्यात आलेले आहेत. यापैकी आपल्याला आवश्यक असलेला निबंध आपण घेऊ शकता आणि त्याचा उपयोग करू शकतात. तर चला Diwali Essay in Marathi ला सुरूवात करूया.
दिवाळी 10 ओळी निबंध - Diwali essay in marathi 10 lines
- दिवाळी हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
- भारतासह हा सण जगभरात राहणारे भारतीय देखील साजरा करतात.
- दिवाळीला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते.
- दिवाळी येण्याआधी घराची व दुकानाची स्वच्छता केली जाते.
- दिवाळी च्या सणाला दिवे लाऊन प्रार्थना केली जाते.
- आम्ही दिवाळीच्या दिवशी आमची घरे रंगीबेरंगी रांगोळ्या, झेंडूच्या माळा आणि अनेक दिव्यांनी सजवतो.
- या दिवशी स्वादिष्ट मिठाई आणि इतर छान छान पदार्थ बनवले जातात.
- दरवर्षी दिवाळी ला माझे आई वडील मला नवीन कपडे घेऊन देतात.
- या दिवशी आम्ही मित्र आणि नातेवाईक मंडळींना मिठाई देतो.
- दिवाळी च्या सणाला कोणीही दुखी राहू नये म्हणून माझे वडील दरवर्षी गरिबांना मिठाई आणि गिफ्ट देत असतात.
दिवाळी निबंध मराठी - Diwali Essay in Marathi
(100 शब्द )
दिवाळी हा आपल्या भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. त्रेतायुगात भगवान श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्याच्या आनंदात अयोध्येत घरोघरी सर्वत्र दिवे लावले गेले, त्यामुळे संपूर्ण अयोध्या स्वर्गासारखी उजळून निघाली. श्री रामांचे अयोध्येतील आगमन म्हणूनच दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग व्यक्ति मोठा असो वा लहान सर्वजण खूप उत्साहाने दिवाळी साजरी करतात. दिवाळी दरम्यान शाळा, कॉलेजांना सुट्ट्या दिल्या जातात. दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते.
दिवाळीचा सण फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेक देशांमध्ये खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. सर्वत्र दिवे आणि आकाशकंदील लावले जातात, रांगोळ्या काढल्या जातात, फटाके फोडले जातात आणि स्वादिष्ट फराळही केला जातो.
अशा प्रकारे दिवाळी हा एक आनंदाचा उत्सव आहे जो आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि बंधुता पसरवतो.
***
दिवाळीचा सण निबंध - Diwali Festival Essay in Marathi
(200 शब्द)
दिव्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. दिवाळी सणाला भारताच्या काही भागांमध्ये ‘दिपावली’ म्हणूनही ओळखले जाते.
भगवान श्रीराम यांनी १४ वर्षांच्या वनवासादरम्यान रावणाचा वध करून अधर्मावर विजय मिळवला आणि अयोध्येला परत आले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी दिवे लावले. व मान्यतेनुसार तेव्हापासूनच दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू होते. या शुभ सोहळ्यासाठी घरे आणि दुकाने स्वच्छ केली जातात, घरांना रंग देऊन त्याचे नूतनीकरण केले जाते. लोक नवीन कपडे, दागिने, दिवे, मिठाई खरेदी करतात. यादरम्यान सर्वत्र अत्यंत उत्साहाचे वातावरण असते.
धनत्रयोदशी पासून भाऊबीजपर्यंत ५ दिवस दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जाते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे पाच दिवस प्रत्येक घरी आनंद घेऊन येतात.
दिवाळीच्या दिवशी, लोक नवनवीन कपडे आणि दागिने परिधान करतात, घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात. घरातील खोल्या, बाल्कनी आणि बागांमध्ये दिवे आणि आकाशकंदील लावून सजावट केली जाते. यामुळे घर अगदी उजळून निघते. घरी स्वादिष्ट फराळ केला जातो. शेव, चकली, चिवडा, शंकरपाळे असा फराळ अतिशय चवीने खाल्ला जातो आणि इतरांनाही दिला जातो.
दिवाळी हा अनेक शतकांपासून संपूर्ण भारतातील लोकांद्वारे साजरा केला जाणारा आनंददायक सण आहे. दिवाळी केवळ घरांनाच नव्हे तर लोकांच्या आत्म्याला देखील प्रकाश देते. असा हा सण समाजातील लोकांना जवळ आणतो आणि आपल्यामध्ये एकतेची भावना निर्माण करतो.
***
वाचा> माझा आवडता सण दिवाळी निबंध
मराठी निबंध दिवाळी - Diwali Essay in Marathi
(300 शब्द)
भारतात सणांची गौरवशाली परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. घरातील अंधार दूर करून दिव्यांचा प्रकाश पसरवणारी दिपावली किंवा दिवाळी सर्व सणांमध्ये सर्वात मुख्य सण आहे.
लंका-विजयानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा अयोध्यावासीयांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून हा उत्सव लोकप्रिय झाला. महाराज युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ याच दिवशी पूर्ण झाला होता, तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो, असेही मानले जाते. काही लोक दिवाळीला भगवान महावीरांचा निर्वाण दिवस मानतात. अशा प्रकारे दिवाळीच्या सणात प्रत्येक भारतीयाला आत्मीयता जाणवते.
दिवाळी आपल्याबरोबर स्वच्छता आणि सजावटीचा सुवर्ण संदेश घेऊन येते. दिवाळी येण्याच्या काही दिवस आधीच, लोक आपली घरे साफ करण्यास सुरवात करतात. लोक नवीन कपडे खरेदी करतात आणि दागिनेही खरेदी करतात. घरगुती मिठाई आणि पदार्थ तयार केले जातात. अशाप्रकारे दिवाळीच्या आगमनापूर्वी सर्वत्र उत्साहाची आणि जल्लोषाची लाट उसळते.
धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत ५ दिवस दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी दिवे, आकाशकंदील आणि विजेचे बल्ब पेटवले जातात. फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण दुमदुमून जाते. धनत्रयोदशीला लोक धनाची आणि संपत्तीची पूजा करतात. चतुर्दशीला 'नरक चतुर्दशी' असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या असूराचा वध केला होता.
अमावास्येचा दिवस म्हणजे दिवाळीचा मुख्य दिवस. या दिवशी लक्ष्मीपूजन असते. याच दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि व्यापारी नवीन हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. नवीन विक्रम वर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. या दिवशी लोक आपल्या नातेवाईकांना भेटतात आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याला मिठाई खाऊ घालते. भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतो.
काही लोक दिवाळीच्या दिवशी पत्ते खेळतात. दिवाळीत खूप फटाके फोडले जातात. यामुळे काहीवेळा भीषण आग लागण्याच्या घटना घडतात. म्हणून आपण फटाके फोडताना काळजी घेतली पाहिजे.
दिवाळीच्या प्रकाशाने आपले घर, अंगण आणि त्याचबरोबर आपले मनही उजळून निघते. आपल्या हृदयातून दुसऱ्यांबद्दल असलेला राग, द्वेष आणि दुरावा काढून टाकला जातो. आपले मन प्रेमाने भरले जाते. यातून सर्वांना नवचैतन्य प्राप्त होऊन आपली कर्तव्ये पार पाडण्याचे बळ मिळते.
हे दीपमालिके, आनंद आणि प्रकाशाची देवी! तुझे नेहमीच स्वागत आहे!
***
दिवाळी मराठी निबंध - Diwali Composition in Marathi
(400 शब्द)
कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा होणारा दीपावली हा सण केवळ हिंदू धर्मासाठीच नाही तर जैन, बौद्ध, शीख इत्यादी धर्मांसाठीही महत्त्वाचा आहे. हा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आणि सांस्कृतिक श्रद्धा आहेत.
आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक, दीपावली किंवा दिवाळी म्हणजे पाच दिवसांचे महापर्वच आहे, हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेपर्यंत चालतो, या सर्व दिवसांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे, यामागे पौराणिक आणि धार्मिक कथा जोडल्या आहेत.
दिवाळीच्या दिवशी लोक आपली घरांची, दुकानांची साफ-सफाई करतात. घरांना रंग लावतात आणि या निमित्ताने नवीन कपडे, भेटवस्तू, भांडी, मिठाई इत्यादी खरेदी करतात. नवीन दुकाने आणि घरे घेण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवाळी एक शुभ दिवस मानला जातो. Diwali Essay in Marathi
दिवाळीच्या पहिल्या दिवशी येते धनत्रयोदशी. हा दिवस घरासाठी काही खरेदी करण्याचासाठी शुभ मानला जातो. या दिवशी धनाची पूजा केली जाते आणि लोक सोने, चांदी यांचीही खरेदी करतात. लोक हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही अनुकूल मानतात.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. हा वध अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे.
तिसरा दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा. हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी लोक रांगोळी आणि दिव्यांनी घर सजवून संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि गणेश ही शुभ सुरुवातीची देवता मानली जाते.
दिवाळीला लोक रस्ते, बाजारपेठा, घरे आणि आजूबाजूच्या परिसरात समृद्धी आणि कल्याणासाठी मातीचे दिवे लावतात.
यावेळी फटाके हे प्रमुख आकर्षण असते. घरात बनवलेला स्वादिष्ट फराळ खाल्ला जातो आणि शेजारी, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना सुद्धा दिला जातो.
लक्ष्मीपूजनाच्या रात्री १२ वाजेपर्यंत लोक लक्ष्मीच्या दर्शनासाठी आतुरतेने घराचे दरवाजे उघडे ठेवतात.
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा आणि गोवर्धन पूजेचा दिवस.
याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा पराभव केला आणि इंद्र पाडत असलेल्या मुसळधार पावसापासून ग्रामस्थ आणि गुरेढोरे यांना वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या एका करंगळीवर उचलला होता.
उत्तर भारतात सायंकाळी खत, ऊस, पुस्तके, शस्त्रे व उपकरणे इत्यादींची पूजा या निमित्ताने केली जाते.
महाराष्ट्र, तमिळनाडू आणि कर्नाटकातील लोक हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा करतात ज्यात भगवान श्रीविष्णूंच्या वामन अवताराने राक्षस राजा बळीवर मिळवलेल्या विजयाची आठवण काढली जाते.
भाऊबीजेचा दिवस हा दिवाळीचा शेवटचा दिवस. हा दिवस भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक आहे. बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतात.
दिवाळीचा सण देशभरातील सर्व लोक अतिशय उत्साहाने साजरा करतात. मुलांना सणाचा आनंद लुटता यावा म्हणून शाळा, महाविद्यालयात काही दिवस सुट्टी दिली जाते. बँका नवीन योजना आणि व्याजदर देतात. दरवर्षी या निमित्ताने मोठ्या बजेटचे नवीन चित्रपट प्रदर्शित होतात.
दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे आपण फटाके फोडताना कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या हृदयातून दुसऱ्यांबद्दल असलेला राग, द्वेष आपण काढून टाकला पाहिजे आणि सर्वत्र प्रेम आणि आनंद पसरवला पाहिजे.
***
तर मित्रहो वरील लेखात आम्ही आपल्यासाठी 4 वेगवेगळी शब्ददमर्यादा असणारे दिवाळी मराठी निबंध दिले आहेत. आशा आहे हे Diwali Essay in Marathi आपणास उपयोगी ठरले असतील. diwali festival essay in marathi आपण आपल्या शालेय कार्यासाठी उपयोगात घेऊ शकतात. तसेच परीक्षेत देखील आपणास दिवाळी सण मराठी निबंध विचारला जातो, तर तेथे देखील हा निबंध उपयोगी ठरू शकतो.