2023 लोकमान्य टिळक भाषण मराठी। Lokmanya Tilak Speech in Marathi

आजच्या या लेखात लोकमान्य टिळक भाषण मराठी भाषेत - Lokmanya Tilak Speech in Marathi देण्यात आलेले आहेत. येथे आपणास एक नव्हे तर 3 वेगवेगळे Lokmanya Tilak bhashan देण्यात आलेले आहेत जे खासकरून School Students साठी अधिक उपयोगाचे आहेत.

Lokmanya Tilak Speech in Marathi : आपला देश भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी आणि विचारवंतांनी आपले जीवन समर्पित केले. यापैकीच एक होते लोकमान्य टिळक. टिळकांना भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक प्रमुख पात्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी शाळा-कॉलेज मध्ये 1 ऑगस्ट ला लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त लोकमान्य टिळक भाषणाचे आयोजन केले जाते. 

जर आपणही लोकमान्य टिळक मराठी भाषण- lokmanya tilak speech in marathi शोधत असाल तर हा लेख आपल्यासाठी फार उपयोगाचा ठरणार आहे. येथे आम्ही आपल्यासाठी lokmanya tilak bhashan समाविष्ट केले आहे. ज्याचा उपयोग आपण आपल्या शाळेत 1 ऑगस्ट ला करू शकतात.

लोकमान्य टिळक भाषण

नमस्कार मित्रांनो लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आज आम्ही तुम्हाला लोकमान्य टिळक भाषण मराठीतून देत आहोत. लोकमान्य टिळकांची माहिती व लोकमान्य टिळकांचे जीवनातील प्रसंग शालेय विद्यार्थ्यांना (lokmanya tilak speech in marathi for school students) खूप महत्वाचे आहे. लोकमान्य टिळक मराठी भाषण (lokmanya tilak Bhashan marathi) तुम्हाला याखाली मिळेल. 


लोकमान्य टिळक 10 ओळी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi 10 Lines 

  1. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला.
  2. लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथेच गेले.
  3. लहानपणापासून टिळकांमध्ये  देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती. टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत.
  4. टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना 'भारतीय अशांततेचे जनक' म्हणून संबोधले आणि 
  5. टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना 6 वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली. 
  6. मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला.
  7. देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. 
  8. लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले.
  9. बाळ गंगाधर टिळक यांना आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. 
  10. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे १ ऑगस्ट १९२० रोजी आजारपणामुळे निधन झाले. 

***


1) लोकमान्य टिळकांचे भाषण - Lokmanya Tilak Speech in Marathi

अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांन बद्दल जे काही दोन शब्द (लोकमान्य टिळक भाषण) सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलाई 1856 रोजी महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. टिळकांचे लहान पणाचे नाव केशव असे होते. केशव ही टिळक घराण्याची कुलदेवता होती म्हणून केशव असे नाव ठेवले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लहानपणापासून देशप्रेमाची भावना त्यांच्यात भरलेली होती. टिळकांचे प्राथमिक शिक्षण मराठीतूनच झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ची पदवी मिळवली. टिळक लहानपणापासून बुद्धिमान होते त्यांची स्मरणशक्ती ही चांगली होती. टिळक लहान असतानाच त्यांचा आई वारल्या व सोळा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला. गणित व संस्कृत हे टिळकांचे आवडते विषय होते. डेक्कन कॉलेजमध्ये असतानाच टिळकांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली. या मैत्रीच्या मदतीनेच त्यांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम केले. सन 1880 मध्ये त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि टिळकांचे सामाजिक जीवन एक शिक्षक आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक या पद्धतीने सुरू झाले. 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले व यात कोणताही पगार न घेत ते काम करू लागले.

देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारवर टीका करू लागले. याशिवाय लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरा करणे सुरू केले.

साल 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी सर्व शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले, त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले आणि केसरी वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.

1897 साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारले. आपल्या वृत्तपत्रातून इंग्रजांवर टीका करणे सुरू केले. यामुळेच इंग्रजांनी टिळकांना कारावासाची शिक्षा ठोठावली. मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

अशा पद्धतीने इंग्रजांशी लढत असताना, इसवी सन 1920 साली दीर्घ आजाराने लोकमान्य टिळकांचे निधन झाले. पंडित नेहरू व महात्मा गांधींना ही बातमी कळताच. नेहरूंनी "भारतातील एक तेजस्वी सुर्याचा अस्त झाला" असे उद्गार काढले. त्यांच्या मृत्यूने दुःखी होऊन गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी दिली. टिळकांच्या अंत्ययात्रेसाठी दोन लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते

 भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणार्या या महान नेत्याला असंतोषाचे जनक मानले जाते. असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. अशा या थोर नेत्याला प्रणाम करत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद..

***

लोकमान्य टिळक भाषण

2) लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi

(800 शब्द)

        आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथिनिमित्त मी तुम्हाला त्यांच्याबद्दल जे काही चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. 

       “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” असे इंग्रजांना अतिशय धाडसाने आणि आत्मविश्वासाने सांगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच लोकमान्य टिळक. 

       भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे जन्मनाव नाव केशव ठेवण्यात आले होते. पण सर्वजण त्यांना लाडाने ‘बाळ’ म्हणत. त्यामुळे मोठे झाल्यावर बाळ गंगाधर टिळक हेच नाव त्यांना पडले. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. 

        टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणेच लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे दिपून जाऊ लागले. गणितामध्ये तर टिळकांचा कोणी हातच धरूच शकत नव्हते. एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत होते. सर्व मुलांनी दिलेली उदाहरणे वहीमध्ये लिहिली अन् सोडवायला सुरूवात केली. टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीमध्ये लिहिले नव्हते. गुरुजींनी टिळकांना विचारले तेव्हा वहीमध्ये न लिहिता टिळकांनी सर्व उदाहरणे उत्तरासहित व योग्यक्रमाने अचूक सांगितली. टिळकांची ही कुशाग्र बुद्धी व स्मरणशक्ती पाहून गुरुजींनासुद्धा खूप आश्चर्य वाटले. 

         टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांची बंडखोर वृत्ती आणि कणखर बाणा लहानपणापासूनच दिसत होता. 

         टिळकांची शेंगांच्या टरफलांची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. एकदा टिळक वर्गात बसलेले असताना, त्यांच्या शेजारच्या बाकावरील मुलांनी शेंगा खाऊन टरफलं टिळकांच्या बाकाखाली टाकली. गुरुजी वर्गात आल्यावर त्यांनी टिळकांना उभे केले व त्यांना ओरडून बाकाखालील टरफलं उचलण्यास सांगितले. तेव्हा टिळक अतिशय ठामपणे म्हणाले की “मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही.” आणि टरफलं उचलण्यास साफ नकार दिला. किती हे धाडस! किती ही हिंमत! आणि किती ही अन्यायाविरुद्ध चीड! पुढे याच वृत्तीने टिळकांना शांत बसू दिले नाही. याच वृत्तीने त्यांना संघर्ष शिकवला, इंग्रज शासनाच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी!  

        लहानपणापासूनच त्यांना उत्साही आणि उत्कट राष्ट्रवादी आणि क्रांतिकारी कार्यात भाग घेण्याची खूप आवड होती आणि म्हणूनच ते अशा राष्टवादी लोकांना पाठिंबा देत असत.

         वयाच्या १६ व्या वर्षी टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १७ व्या वर्षी त्यांचे लग्न सत्यभामाबाई उर्फ तापीबाई यांच्यासोबत झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. १८७६ साली टिळक गणित विषयातून बी.ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले. यावरच न थांबता पुढे त्यांनी एल.एल.बी देखील केले. 

         डेक्कन कॉलेज मध्ये असताना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. १८८० मध्ये त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेज चालू केले. 

         टिळकांनी लोकजागृतीसाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे चालू केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी, हा त्यामागील उद्देश्य होता. १८९६ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतकाऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले आणि केसरी वृत्तपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. १८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. 

         भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेले अत्याचार पाहिल्यानंतर टिळकांनी आपले जीवन भारत आणि भारतातील जनतेला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केले होते.

          टिळकांच्या सिंहगर्जनेने संपूर्ण इंग्रज सरकार हादरून जात असत. टिळकांनी संपूर्ण स्वराज्य घेण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या नेतृत्वाच्या अनोख्या शैलीमुळे त्यांना जनमानसात लोकप्रिय केले, इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती. त्यांना ब्रिटिश सरकारने भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले.

          ते एक दूरदर्शी नेते होते ज्यांनी माध्यमे आणि संप्रेषणाची क्षमता समजून घेतली आणि त्याचा उपयोग भारतातील ब्रिटीश राजवटीविरुद्ध समर्थन गोळा करण्यासाठी केला. टिळकांनी केसरी मध्ये अनेक अग्रलेख लिहिले. ‘या सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय?’, ‘उजाडले पण सूर्य कुठे आहे?’ अशा अग्रलेखांमधून टिळक इंग्रजांवर तुटून पडत. 

           टिळक जहालवादी होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेच लागेल, नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही, असे ते मानत. “कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील मी” असे ते म्हणत. आणि अश्याच आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. चाफेकर बंधूंसारख्या कित्येक युवकांना स्वराज्यासाठी क्रांती  करण्यास त्यांनी प्रेरित केले.  

           इंग्रज सरकारशी लढताना त्यांना ६ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली, त्यावेळी त्यांनी मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते.

          टिळक म्हणत, “कोण कुठला हा इंग्लंड देश? आपण सर्व भारतीय एकत्र येऊन त्यावर थुंकलो तरीही त्यात वाहून जाईल.” स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. “देशकार्य म्हणजेच देवकार्य” हा विचार त्यांनी भारतातल्या कित्येक लोकांमध्ये रुजवला आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. 

          भारतमातेच्या या अनमोल रत्नाचे १ ऑगस्ट १९२० रोजी आजारपणामुळे निधन झाले. 

         भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे असे थोर व्यक्तिमत्त्व आपल्याला लाभले, याचा मला फार अभिमान आहे. अशा या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम करून शेवटी एवढेच म्हणेल, 

“पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती

होवोनिया बेभान धावले भारतमातेसाठी

कधी न थांबले विश्रांतीस्तव, पाहिले न मागे

संघर्षातून विणले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे !”

धन्यवाद.. lokmanya tilak speech in marathi

*** 

वाचा> लोकमान्य टिळकांची संपूर्ण माहिती


3) लोकमान्य टिळक भाषण - Lokmanya Tilak Bhashan

(1000 शब्द)

 एक झुंजार शिल्पकार

स्वराज्यासाठी लढले

निर्भय मनाचे रत्न

लोकमान्य एकचं होऊन गेले...

ध्येयवादी विचारांनी भरलेले आणि आपले संपूर्ण आयुष्य देशकार्यासाठी घालवण्याचा पक्का निर्णय करणारे या मातृभुमीतले हीरे, लोकमान्य टिळक यांचे जन्म नाव केशव तथा बाळ गंगाधर टिळक असे होते. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झाला. तसे तर दापोली मधले चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांच्या वडीलांचे म्हणजेच गंगाधरपंतांचे वास्तव्य शिक्षकाच्या नोकरीमुळे रत्नागिरीला होते. 

टिळकांचे प्राथमिक शिक्षण तिथे करत असतांना त्यांच्या वडिलांची शाळाखात्यात इन्स्पेक्टर म्हणून पुण्यात बदली झाली. पुढे त्यांचे शिक्षण पुण्यात झाले.हायस्कूलमध्ये शिकतांना वडिलांनी त्यांच्या कडून खूप पाठांतर करून घेतले. सोबतचं संस्कृत आणि गणित या दोन विषयांचीही खोलात ओळख करून दिली. टिळकांचे माध्यमिक शिक्षण पुण्यात सुरू होते पण काही काळातच त्यांच्या आईचे निधन झाले.  

यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या काकुने केले. मॅट्रिकला असतांना त्यांच्या वडिलांचे १८७२ साली निधन झाले. तेव्हाच त्यांचा विवाह सत्यभामाबाईंशी झाला. त्यानंतर १६ व्या वर्षी मॅट्रिक पास झाले आणि उच्च शिक्षणासाठी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला . घरची परिस्थिती थोडी बरी असल्याने वडिलांनी ठेवलेल्या पैंश्यामुळे जास्त अडचण आली नाही. टिळक बीए या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत गणित विषयात १८७६ मध्ये उत्तीर्ण झाल्यावर १८७९ मध्ये एल. एल.बी. झाले.

शाळेत आणि महाविद्यालयात प्रखर विचाराचे, निर्भय, कुशाग्र बुध्दी आणि प्रचंड वाचन यामुळे हुशार विद्यार्थी म्हणून टिळक ओळखले जात होते. पण त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यामुळे चेष्टेला सोमोरे जावं लागलं तेव्हा यात खचून न जाता प्रकृती सुधारण्याचा विचार करून सकस आहार व्यायामाने एका वर्षात प्रकृतीमध्ये थोडा फार होईना बदल केला. 

महाविद्यालयीन शिक्षण घेतांना तरुणांच्या मनात आत्मविश्वास जागा होतो आणि तो देशकार्य करण्याचे स्वप्न बघतोच. पण टिळक आणि त्यांच्या सोबत असणारे गोपाळ गणेश आगरकर यांनी फक्त स्वप्न बघितलेच नाही तर ते प्रत्यक्ष उतरवले. दोघांमध्ये कितीही मतभिन्नता असली तरी त्यांचा ध्यास मात्र सारखा होता. त्यांच्यामध्ये खूप वेळा चर्चेचे रुपांतर वादात झाले पण तरी ते थांबले नाही आणि आपले पाऊले पुढे टाकायला सुरुवात केली. 

याचा प्रारंभ झाला तो निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पुण्याच्या  न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेने आणि  तिथेच टिळक व आगरकर यांनी पगार न घेता शिक्षकांचे काम सुरू केले. पुढे २४ आॅक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर पुण्याला १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू केले . उच्च शिक्षणात काम करण्याचे टिळक व आगरकर यांचे स्वप्न प्रत्यक्षात आले.

 टिळकांना गणित विषयात विशेष रूची होती. काॅलेज मध्ये गणित शिकवताना टिळक रंगून जायचे. गणितातील विविध प्रमेय पुस्तकाव्यतीरिक्त स्वतंत्र पद्धतीने सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा."गणित आणि काव्य यांची तुलना करताना ते लिहितात की ' गणितात काव्य असते आणि काव्यात गणित असते. पण ते कळायला बुद्धीची झेप असावी लागते.

 १८७६-७७ मध्ये पडलेल्या दुष्काळानंतर सरकारने फॅमिन रिलीफ कोड पास केला .त्या कोडची माहिती मराठीमध्ये नमुद करण्याची मागणी सरकारकडे केली. मागणी फेटाळल्यानंतर लेखाद्वारे त्यांनी त्यांचे विचार मांडले . कायद्याच्या चौकटीत राहूनही सरकारवर दबाव कसा आणता येते हे टिळकांनी दाखवून दिले. १८९७ मध्ये प्लेगच्या साथीची आपत्ती पुणे शहरावर कोसळली होती . त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले होते . तेव्हा निर्भयपणे टिळकांनी लोकांमध्ये राहून काम केले आणि त्यांना धीर देत राहिले . समाजजागृती तर केलीच सोबत सरकार जेथे चुकेल तिथे सडेतोडपणे टिकाही करत होते . कुठल्याही परिस्थितीला न घाबरता सामोरे जाणे हा त्यांचा स्वभावच होता.

आणखी एकदा तुरुंगवास भोगत असताना टिळकांनी ' ओरायन' हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामुळे जगातील विद्वानांनी त्यांच्या सुटकेचे प्रयत्न केले . अखेर ११ महिने तुरुंगात राहिल्यानंतर ६ सप्टेंबर १८९८ ला टिळकांची मुक्तता झाली. या व्यतिरिक्त 'आर्क्टिक होम इन दि वेदाज ' हा इंग्रजी ग्रंथ लिहिला.

अध्यापन क्षेत्रात काम करताना आणि देशाची स्थिती बघता कार्य करण्यासाठी वर्तमानपत्र हे एक प्रभावी साधन आहे याची जाणीव टिळक आणि आगरकर यांना झाली . आर्थिक पाठबळ नसतांनाही लोकांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी २ जानेवारी १८८१ ला  'मराठा' हे इंग्रजी तर दोनच दिवसांनी 'केसरी' हे मराठी साप्ताहिक सुरू केले. मराठाचे संपादक टिळक होते आणि केसरीचे आगरकर होते. याच वर्तमानपत्रात बनावट पत्रे छापण्याच्या विरोधात टिळक व आगरकर यांना मुंबईतील डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथले वर्णन त्यांनी ' डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस या छोट्या पुस्तकात केले. पण या कसोटीच्या क्षणाला त्यांनी तोंड दिले आणि आपल्या व्यक्तीमत्त्वाचा पैलू दाखवला. वैचारिक मतभेदांमुळे आगरकरांनी केसरी सोडला आणि दोन्ही वृत्तपत्रे टिळकांनी सांभाळले. या वृत्तपत्रातून तसेच स्वतंत्र भाषणातून टिळकांनी ब्रिटिश राजवट करीत असलेल्या अन्यायांवर व अत्याचारांवर टिका करण्यामुळे त्यांनी अनेक वेळा कारावास भोगला.

विविध लेख लिहिल्यानंतरही लोकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कार्य करणे आणि लोकांना संघटित करून राजकीय चळवळ पूर्ण न्यायचे त्यांनी ठरवले. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक स्वरुपातील गणेशोत्सव सुरू केला. तसेच शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोध्दाराकरीता १८९५ मध्ये त्यांनी चळवळ सुरू केली आणि १८९६ मध्ये पहिला शिवाजी उत्सव  रायगडावर मोठ्या प्रमाणात साजरा झाला . अशा नवनव्या लोकजागृती उत्सवामुळे टिळकांची लोकप्रियता वाढली. याच काळात वाद सुद्धा जास्त व्हायला लागले पण प्रत्येक वादात त्यांची बुद्धीमत्ता, निर्भयता यांचा प्रत्यय लोकांना आला. समाजात वावरताना समाजात असणारे दोष आपण आधी दुर करावे असे त्यांना वाटायचे त्यासाठी लोकांमध्ये गमावलेला आत्मविश्वास परत आणायचे त्यांनी ठरवले. १९०० ते १९०५ या काळात टिळकांनी जे लेखन केले त्यावरुन त्यांच्या वैचारिक भुमिकेचे दर्शन घडते. कठोरपणे टिका करताना अनेक राजकीय व सामाजिक प्रश्नांवर लिहून सरकारचा खरा चेहरा दाखवत राहिले. ज्या तरुणांना परदेशात जाऊन आधुनिक विज्ञानाचे शिक्षण घ्यायचे आहे त्यांना उत्तेजन देत होते.

देशकार्य आणि लिखाणकाम सुरू असताना मनात स्वराज्या विषयी असणारी तळमळ कायम होती. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारचं 'असे ठामपणे सांगणारे लोकमान्य टिळकच होते. स्वराज्य हे ध्येय साध्य करण्यासाठी ' साधनानाम् अनेकता' हे सुत्र अवलंबले पाहिजे, ही टिळकांची भूमिका होती.

या निरंतर चाललेल्या कार्यात भर पडली ती अरविंद घोष यांच्या अहमदाबाद येथे झालेल्या भेटीने. दोघांची ध्येयाबद्दल एकवाक्यता होती आणि सहकार्य करण्याची उत्कट इच्छा होती. तेव्हा अरविंदबाबुंना बरोबर घेऊन राजकीय चळवळीत जहाल वळण देण्याचा त्यांचा निर्धार होता. अशा प्रकारे स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण या दोन कारणांसाठी टिळक अविरत झटत असताना राजकीय प्रश्नाकडे त्यांचे कधीच दुर्लक्ष झाले नाही. राजकीय चळवळीत जहाल आणि मवाळ असे गट पडले होते त्यात लोकमान्य टिळक हे जहाल गटाचे होते आणि त्यांना स्वराज्य मिळवण्यासाठी याच नीतीचा अवलंब करायचा होता. कलकत्ता येथे कॉग्रेसच्या अधिवेशनात मवाळांच्या धोरणास बाजूला सारून स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या लो. टिळकांच्या चतु:सुत्रीस मान्यता मिळाली.

लो. टिळक वर्तमानपत्रात अग्रलेख लिहून सरकारवर निर्भयपणे टिका करत असत पण केसरीमध्ये ' देशाचे दुर्दैव ' या लेखाबद्दल १९०८ मध्ये त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठविण्यात आले आणि सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगात सुद्धा त्यांचे वाचन थांबले नाही. तिथेच मंडालेच्या तुरुंगात त्यांनी भगवद्गीतेचा दीर्घ विचार करून 'गितारहस्य' हा ग्रंथ अवघ्या साडेतीन महिन्यांत लिहून पूर्ण केला.

भारतीयांमध्ये राजकीय आकांक्षा निर्माण करून स्वराज्यासाठी एकत्र आणण्याचे काम टिळकांनी केले. निर्भयपणे लढणाऱ्या या शक्तीच्या उगमस्थानासारखे असणाऱ्या स्वातंत्र्यवीराचे निधन १ ऑगस्ट १९२० रोजी झाले. स्वराज्याच्या निर्मितीसाठी लढणाऱ्या कित्येक व्यक्ती काळाच्या ओघात पडद्याआड गेल्या, परंतु लोकमान्यांच्या स्मृती कायम जागृत राहणार.मित्रांनो lokmanya tilak speech in marathi मध्ये टिळकांच्या जीवनातील मूलभूत गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. आपल्या शाळेत लोकमान्य टिळक भाषण देतांना आपण या गोष्टी लक्षात घेऊ शकतात. याशिवाय वरील भाषणातून प्रेरणा घेऊन आपण स्वतः आपले भाषण देखील लिहू शकतात. हे lokmanya tilak speech in marathi for school students शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयोगाचे आहे. 

Tags: लोकमान्य टिळक भाषण, Lokmanya Tilak information in Marathi speech, Lokmanya Tilak Bhashan Marathi madhe, Lokmanya Tilak Marathi, Lokmanya Tilak punyatithi.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने