वर्तमान पत्र बंद झाली तर मराठी निबंध | vartman patra band zali tar essay in Marathi

वर्तमान पत्र नसती तर मराठी निबंध | vartman patra naste tar marathi nibandh

आजच्या या लेखात वर्तमान पत्र बंद झाली तर या विषयावर लहान व मोठे मराठी निबंध देण्यात आले आहेत. हे निबंध शालेय विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहेत.


vartman-patra-naste-tar
vruttapatra naste tar

वर्तमान पत्र बंद झाली तर मराठी निबंध | vartman patra band zali tar essay in Marathi (200 शब्द)

आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग म्हणजे वर्तमानपत्र. ज्याच्या नावाचा शब्दशः अर्थ आहे वर्तमान बद्दल माहिती देणार पत्र, मराठी भाषेत सुरू केलेल्या पहिल्या वर्तमान पत्राचे नाव दर्पण होते. जगभरातील घडामोडींची माहिती देणारे, जगभरात चालणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीं सांगणारे वर्तमानपत्र..! परंतु तुम्ही कधी विचार केलाय कि, जर ही वर्तमानपत्र बंद पडली तर...? काय होईल बर... खर म्हणजे तर सध्याचा या डिजिटल जगात आपण सर्वजण एवढे मोबाईल फोन्स, लॅपटॉप, कॉम्प्युटर इत्यादि मध्ये रमले आहोत की आपल्यातील काही लोकांना त्या वृत्तपत्राची आठवण देखील येत नाही.


परंतु एकेकाळी याच माध्यमातून आपणास सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय तसेच जागतिक घडामोडींची माहिती मिळायची. आणि आजही काही लोक ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्या तर दिवसाची सुरुवात वर्तमानपत्रानेच होत असते. आणि जर ही वृतपत्रच बंद पडली तर त्या लोकांच्या दिवसाची पूर्ण रूप रेखाच बदलून जाईल.....


ग्रंथालयात जाऊन सर्वात आधी आपण बघतो तरी काय तर ते वर्तमानपत्र आणि तेच नसेल तर कसे होईल? येणारी जी पिढी आहे तिला वाचनाची आवड कशी निर्माण होईल..! वर्तमानपत्र आणि पुस्तके याच्यातून तर हा छंद जोपासला जातो. वयोवृद्ध तसेच रिटायर झालेले लोकांद्वारे ग्रंथालयात जाऊन वर्तमानपत्र वाचतांना वेगवेगळ्या विषयावर केली जाणारी चर्चा नेहमीसाठीच बंद होईल.


वर्तमानपत्र बंद झाली तर आपण सर्वांना चालू घडामोडी साठी फक्त आणि फक्त टीव्ही व इंटरनेट या दोनच गोष्टींवर अवलंबून राहावं लागेल. परंतु आर्थिकदृष्ट्या टीव्ही व इंटरनेटपेक्षा वर्तमानपत्राचा वापर हा फायदेशीर आहे. त्यामुळे सर्वच दृष्टिकोनातून बघायला गेले तर वर्तमानपत्र बंद होणे म्हणजे आपल्या सर्वांसाठी खूप नुकसानदायक आहे 

---


वर्तमान पत्र बंद झाली तर मराठी निबंध | If there were no newspaper Marathi essay (300 शब्द)

वर्तमान पत्र नाव समोर येताच एक दहा ते बारा पानांचा समूह  डोळ्यासमोर येतो. ज्याला आपण बालपणापासून बघत आलो आहोत. वर्तमान पत्रात येणाऱ्या पुरवण्या ज्या प्रत्येक दिवसाला काही वेगळ सांगून जातात, या पुरवण्या प्रत्येकालाच वाचायला आवडतात.  परंतु जर हीच वर्तमान पत्र बंद झाली तर.....हा विचार देखील मनाला हलवून जातो. जर वृत्तपत्र बंद झाली तर आपल्याला प्रत्येक सकाळी मिळणारी नवनवीन माहिती कशी मिळणार? आपल्या दिवसाची सुरुवात जी याच वर्तमानपत्राने होत असते ती कुठेतरी थांबल्यासारखी वाटेल. 


वृत्तपत्रे नसतील तर विविध प्रकारच्या जाहिरातींचा आपल्यावर होणारा मारा थांबेल. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे कथन कोण करेल ? प्रतिस्पर्धेच्या या युगात आपण खूप मागे राहून जाऊ. वर्तमान पत्र बंद म्हटली की वाचनालय बंद पडतील जी लोकं सुट्टीच्या दिवशी वाचनालयात जाऊन आपला वाचनाचा छंद जोपासत असतात त्यांना त्यांच्या छंद दूर करावा लागेल. एवढेच नव्हे तर देशातील साक्षरता दर देखील कमी होईल.


काही लोक असे आहेत ज्यांना वर्तमान पत्रात दररोज राशी भविष्य वाचण्याची सवय असते. आपले राशी भविष्य वाचूनच ते दिवसाची सुरुवात करतात. आशा लोकांना तर रोज काही तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटेल. जी लोकं शेअर बाजारात गुंतवणूक करणे पसंत करतात त्यांना रोजच्या शेअर च्या किमती कश्या कळतील? आणि जर गुंतवणूकदार गुंतवणूक नाही करणार तर आपल्या देशाचा विकास कसा होणार ? वृत्तपत्र बंदीमुळे इत्यादि अनेक गोष्टींवर परिणाम होईल जो आपल्या व आपल्या येणाऱ्या पिढीला नक्कीच त्रासदायक ठरेल.


वर्तमान पत्र म्हटली म्हणजे घरी बसल्या सर्व माहिती मिळण्याचे एक साधन आहे. ज्यात दररोज फक्त तीन ते पाच रुपयाचा खर्च येतो. टीव्ही तसेच इंटरनेट च्या किमितीपेक्षा वृत्तपत्राची किंमत कमी आहे. याशिवाय वृत्तपत्र वाचनाने वाचनाचे अनेक फायदे देखील मिळतात. जूने झाल्यावरही वृत्तपत्र अनेक काऱ्यांसाठी उपयोगी सिद्ध होते. जुन्या वृत्तपत्राला स्वच्छता, पुस्तकाचे कवर, सजावट इत्यादि अनेक गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते.  


लोकशाही मध्ये वृत्तपत्र आणि टीव्ही मीडिया चे महत्व खूप आहे. एक खऱ्या लोकशाही देशात वृत्तपत्र पूर्णपणे स्वतंत्र असतात. ज्या देशात वृत्तपत्र बंद केले जातात अथवा त्यांच्यावर मर्यादा आणल्या जातात तो देश हुकुमशाही कडे वाटचाल करीत आहे असे समजावे. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि म्हणून भारतातील वृत्तपत्र बंद होणे याचाच अर्थ आपल्या व आपल्या देशाच्या विकासात अडथळा निर्माण होणे आहे.

---


वर्तमान पत्र बंद झाली तर मराठी निबंध | vartman patra band zali tar essay in Marathi (500 शब्द)

वर्तमान पात्राचे महत्व

आजच्या काळात वर्तमान पत्र हे अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनले आहे. त्यात स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा उल्लेख केलेला असतो. हल्लीच्या वर्तमान पत्रात बारा ते चौदा पानांचा समावेश असतो. ज्यात बातम्या शिवाय वेगवेगळ्या  विषयांवरील लेख आणि विशेष पुरवणीचा देखील समावेश केला जातो. जास्तकरून वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर महत्त्वाच्या बातम्याचा छापल्या जातात. यानंतर च्या पानात सोन्या चांदीच्या दरात झालेली वाढ व घट, क्रीडाक्षेत्र, सिनेसृष्टी, मनोरंजन, आरोग्य, संपादकीय लेख इत्यादींसाठी वेगवेगळे भाग केलेले असतात. परंतु बऱ्याचदा माझ्या मनात विचार आला आहे की जर ही वर्तमान पत्रच बंद झाली तर.... सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसाची सुरुवात कशी होणार? कारण सकाळी उठल्याबरोबर अनेकांचा तर दिनक्रम  ठरलेला असतो, आधी वर्तमान पत्राचा आढावा घ्यायचा आणि मग दुसऱ्या कामांना सुरुवात. वर्तमान पत्र बंद झाल्यावर त्यांचा तर दिनक्रमच चुकेल....


वर्तमान पत्राचा इतिहास

आपल्या देशातील वर्तमान पत्राचा इतिहास हा फार पूर्वी पासून चालत आला आहे, स्वातंत्र्यापूर्वी लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी २ वर्तमान पत्र सुरु केली त्यांचे नाव केसरी व मराठा होते. त्या काळात देशात इंग्रजांचे शासन असल्या कारणाने एखादे स्वतंत्र वृत्तपत्र सुरु करणे ही खूप मोठी गोष्ट मानली जात असे. लोकमान्य टिळक व इतर क्रांतिकारी नेत्यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रामुळे वीर सैनिकांच्या कामगिरीच्या, त्यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टींबद्दल देशातील जनतेला माहिती मिळत असे. अशी ही वर्तमान पत्र आजवर आपल्या प्रगती मध्ये मोठा वाटा देऊन आहेत. आज आपल्या देशात वेगवेगळी वर्तमान पत्र उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या भाषेत मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती ई. अनेक वृत्तपत्र छापली जातात. आणि यांच्या बंद व्हायची गोष्ट म्हणजे तर मग माणसाच्या प्रगतीमध्येच घट होय..!


वर्तमान पत्र बंद झाल्याचा परिणाम

वर्तमान पत्र बंद झाल्याने ज्या लोकांचा उदरनिर्वाह त्यावर चालत आहे त्यांना आजच निकामी व्हावे लागेल. या मध्ये घरोघरी वर्तमान पत्र वाटणाऱ्या व्यक्तीपासून तर ते तयार करणाऱ्या कंपनीतल्या पत्रकार, संपादक, लेखक इत्यादि सर्वांचा समावेश आहे. मोठमोठ्या वृत्तपत्र कंपन्या ज्या आपल्या देशात एक, दोन नाही तर शेकडो वर्षांपासून आहेत आणि त्यात काम करणारे हजारो लोक जे कित्येक वर्षांपासून तेथे कार्यरत आहेत त्यांना आपले काम सोडून उदरनिर्वाहासाठी दुसरा काहीतरी पर्याय शोधवा लागेल. वर्तमान पत्र बंद झाल्याने खूप लोक बेरोजगार होतील आणि हे सर्व आपल्या देशाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल करेल. याचाच परिणाम महागाई वाढ व देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल.


शाळेत जाणारी मुलं ज्यांना वर्तमान पत्र वाचल्यामुळे वाचनाचा छंद लागतो तो कुठेतरी नाहीसा होईल. त्याचप्रमाणे त्यांना जगभरात घडणाऱ्या घडामोडींबद्दल माहिती पोहचविण्याचे साधन नष्ट होईल. शिवाय शैक्षणिक प्रगती मंदावली जाईल. लहान मुलं ज्यांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यात की त्यांच्या साठी एक विशेष पुरवणी सुरु होते, जिच्यात छान छान गोष्टी तसेच बोधकथा असतात त्यातून मुलांना खूप काही शिकायला मिळते, वर्तमान पत्र बंदीमुळे मुलांना नवीन गोष्टी कळणार नाहीत. जी मुलं सरकारी नोकरी साठी तयारी करत असतात त्यांच्यासाठी असणाऱ्या नवनवीन संधींची माहिती त्यांना मिळणार नाही. या सर्वांचा परिणाम त्यांच्या करियर वर  होईल. घरातील वयोवृध्द माणसे ज्यांना जसा वेळ मिळेल तसे वृत्तपत्रातील शब्दकोडे सोडवण्याचा छंद असतो त्यांच्या तर करमणुकीचे साधन नाहीस होईल. त्यांना वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी विषय उपलब्ध होणार नाहीत वर्तमान पत्र जर बंद झाली तर त्याचे परिणाम सर्वच वयातील लोकांवर होतील. 


वर्तमानपत्र बंद झाली तर चालू घडामोडी साठी फक्त आणि फक्त टीव्ही व इंटरनेट या दोनच गोष्टींवर अवलंबून राहावं लागेल. परंतु जास्त वेळ टीव्ही अथवा मोबाइल ची स्क्रीन पहिल्याने डोळ्यांना त्रास निर्माण होतो. म्हणून मोबाइल मध्ये बातम्या वाचने अथवा टीव्ही वर पाहने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर नाही. तस पाहायला गेले तर आर्थिकदृष्ट्याही वर्तमानपत्राचा वापर हा फायदेशीर आहे, दिवसाला पाच रुपयाला मिळणाऱ्या वर्तमान पत्राचा खर्च हा डिश तसेच इंटरनेटच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे.


वर्तमान पत्र हे एकमेव अस माध्यम आहे की त्याचा एकदा वापर केल्या नंतर देखील आपण पुनर्वापर करू शकतो, एक तर रद्दी म्हणून पैसे मोकळे करू शकतो किंवा स्वयंपाकघरात  स्त्रिया त्याचा वापर करू शकता. एक तीन ते पाच रुपयाचे मूल्य असलेलं वर्तमान पत्र अतिशय उपयोगाचे आहे म्हणून वर्तमान पत्र बंद होणे हे आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक या सर्व गोष्टींवर नक्कीच परिणाम करेल.

---

तर मित्रांनो हे होते vartman patra band zali tar या विषयावरील मराठी निबंध. आशा आहे की वृत्तपत्र बंद झाले तर हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल ह्या निबंधला आपल्या मित्रांसोबत शेअर करून आम्हास सहाय्य करा. धन्यवाद


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने