मी फळा बोलतोय मराठी निबंध : फळा ही एक अशी वस्तु आहे जिचा वापर प्रत्येक व्यक्तीने आपल्या विद्यार्थी जीवनात कधी न कधी केलेलाच असतो. आज आपण वर्गातील अविभाज्य घटक असलेल्या या फळ्याचे आत्मवृत्त पाहणार आहोत. तर चला या मराठी निबंधला सुरुवात करूया..
मी फळा बोलतोय मराठी निबंध | autobiography of a blackboard in marathi
(400 शब्द)
मी जरी दिसण्यात काळा असलो तरी अनेक लोकांचे यशस्वी आणि उज्वल भवितव्य मी घडवले आहे. माझ्यावर लिहिण्यात आलेली गणिते, विज्ञान, इंग्रजी आणि सुंदर सुविचार यांनी अनेक आदर्श विद्यार्थी आणि आदर्श नागरिक घडवले आहेत. मित्रांनो कदाचित आपण मला ओळखलेच असेल? नाही ओळखले तर ऐका, मी एक फळा बोलतो आहे. माझा जन्म एका कारखान्यात काही मशीनच्या मदतीने झाला होता. माझ्यासोबत माझे अनेक मित्र होते. आम्हा सर्वांना एका लाकडी खोक्यात ठेवण्यात आले होते. यानंतर आम्हाला शहरात आणून विविध दुकानावर विक्रीसाठी ठेवण्यात आले.
एके दिवशी एक मुलगा आपल्या आईवडिलांसोबत त्या दुकानात आला. मुलाला एक मोठा फळा घ्यायचा होता. मी विचार करू लागलो की या दुकानात सर्वात मोठा फळा तर मीच उरलो आहे, म्हणून नक्कीच आज माझी येथून जाण्याची वेळ आली आहे. मुलगा व त्याचे वडील एक एक फळे बघत माझ्यापर्यंत आले. त्यांनी माझी किंमत पाहिली, परंतु किंमत जास्त असल्याने मुलाच्या वडिलांनी सुरूवातीला तर नकार दिला परंतु शेवटी मुलाच्या हट्टापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. आणि त्यांनी मला खरेदी केले.
घरी आल्यावर मला लक्षात आले की त्या मुलाचे नाव रोहित होते. रोहित माझी खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत असे. तो इयत्ता 7 वी मध्ये शिकत होता. त्याने मला आपल्या स्टडी रूमात लावले. दररोज मला स्वच्छ करून तो माझ्यावर लिहित असे. त्याची पाठांतर केलेली उत्तरे, गणिताचे उदाहरण, आकृत्या तसेच चित्रकलेची चित्रे तो माझ्यावर काढीत असे. मला खूप आनंद होत असे कारण रोहित आपला अत्याधिक वेळ माझ्यासोबतच घालवत असे.
दिवसामागून दिवस जाऊ लागले. 3 वर्षे झाली आता रोहित चांगल्या मर्कांनी 10 वी पास झाला. त्याचा नंबर शहरातील मोठ्या कॉलेज मध्ये लागला. आता रोहित बाहेरगावी शिकायला जाणार होता. म्हणून त्याने मला दुसरे कोणाला देऊन देण्याचा निर्णय घेतला. परंतु कोणालाही माझी गरज नव्हती. शेवटी त्याने मला उचलून स्टोअर रूम मध्ये ठेवून दिले. व तो बाहेरगावी शिकण्यासाठी निघून गेला.
रोहित जेव्हा लहान होता तेव्हा मला त्याच्यासोबत खूप आनंदी वाटायचे. परंतु आज तो मला एकटे सोडून गेला होता. मी खूप दुःखी होतो, मला वाटायला लागले की हा माझ्या आयुष्याचा शेवट आहे. अनेक दिवस गेले एकेदिवशी रोहित ची मम्मी स्टोअर रूम मध्ये आली. त्या दिवस स्टोअर रूममधील सर्व अनावश्यक समान बाहेर काढण्याचा त्यांचा विचार होता. त्या नको असलेल्या सामान मध्ये मलाही टाकण्यात आले. एक भंगारवाला मला व माझ्या सोबत काही टाकाऊ लोखंड आणि प्लास्टिक चे भंगार घेऊन निघाला.
परंतु लाकडी फळा भंगार म्हणून विकला जाणार नाही असा विचार करून त्याने मला कचराकुंडीत टाकून दिले. त्या कचरा कुंडी जवळ काही गरीब लोक आले त्यांनी मला बाहेर काढले आणि माझा उपयोग टेबल म्हणून करू लागले. नंतर त्यांनी ऊन तसेच पावसापासून रक्षण म्हणून ही माझा उपयोग केला. मी आता त्या स्टोर रूम मधील जीवनापेक्षा आनंदी जीवन जगत होतो. हा आनंद होता दुसऱ्यासाठी कामात येण्याचा आणि दुसऱ्याचे सहाय्य करण्याचा...
***
फळ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध | autobiography of a blackboard in marathi
(300 शब्द)
मी एक फळा आहे. माझे आयुष्य थोडे मनोरंजक आणि चित्तवेधक आहे. मी लोकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतो. आणि आज मी सर्वांना माझे महत्त्व सांगण्यासाठी माझी आत्मकथा लिहीत आहे.
माझ्या जन्म एक कोरा फळा म्हणून झाला होता. या कोऱ्या फळ्यावर कोणीही त्याचे विचार मांडू शकत होते. मी खरोखर एक महान शोध होतो. झाडे, दगड यांच्यावर लिहित बसण्यापेक्षा माझ्यावर लिहिणे सोपे आणि सरल होते. आधीच्या काळात जेव्हा भाषेचा विकास झाला नव्हता तेव्हा काही लोक माझ्यावर चित्र आणि आकृत्या काढून संवाद साधत असत.
जसा वेळ बदलत गेला तशी संभाषणाची साधने देखील बदलली. नंतरच्या काळात कागदाचा शोध लागला. आणि लोक कागदावर आपले विचार काढू लागले. माझा उपयोग आधी पेक्षा कमी झाला. कारण कागद हे एका जागेवरून दुसर्या जागी सहज नेता येणारे साधन होते. म्हणून माझा उपयोग फक्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केला जाऊ लागला. शाळेतील शिक्षकांसाठी मी अतिशय महत्त्वाचे साधन आहे. माझ्यावर खडूच्या मदतीने लिखाण केले जाते. जेव्हा शिक्षक माझ्यावर खडू फिरवतात तेव्हा मला गुदगुल्या पडतात. खडू आणि मी खूप चांगले मित्र बनलो आहेत. मी खडू शिवाय अपूर्ण आहे आणि खडू माझ्याशिवाय. परंतु डस्टर आम्हा दोघांचे शत्रू आहे. ते खडूने माझ्यावर लिहिलेले सुंदर अक्षर पुसून टाकते. परंतु तरीही आमची मैत्री कमी झालेली नाही आहे.
आज मनुष्याने लावलेले नवनवीन शोध जसे मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि स्मार्ट डिस्प्ले मुळे माझा वापर आधीपेक्षा खूप कमी झाला आहे. आता बऱ्याच शाळांमधूनही मला बरखास्त करण्यात आले आहे. माझ्या ऐवजी टच स्क्रीन डिस्प्ले चा वापर केला जात आहे. ह्या डिस्प्ले वर लिहिण्यासाठी खडूची आवश्यकता राहत नाही. आपल्या बोटाने शिक्षक यावर अक्षरे गिरवू शकतात. याला पुसण्यासाठी डस्टर ची आवश्यकता नसते. इरेज फंक्शन वापरून लिहिलेले एका क्षणात पुसता येते.
या टच स्क्रीन डिस्प्ले वर कोणतेही चित्र, आकृत्या, गणिते, व्हिडिओ दाखवता येतात. ही फंक्शने माझ्यात नव्हती म्हणून आज माझ्या जागी याचाच वापर केला जात आहे. परंतु जरी आजच्या आधुनिक युगात माझा वापर कमी झालेला असला तरीही माझे महत्त्व मात्र कमी झालेले नाही. ते पूर्वीसारखीच आहे. आणि आजही जे गरीब विद्यार्थी महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना माझ्याच साह्याने शिकवले जाते.
***
मित्रहो आशा करतो की आजचा हा मी फळा बोलतोय मराठी निबंध आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. ह्या निबंधाला आपले मित्रांसोबतही शेअर करा. धन्यवाद...
READ MORE: